By The Vidarbha News -October 24, 2020
सौ.सुषमा योगेश कोठीकर, सहायक शिक्षिका सरस्वती विद्यालय, अमरावती
अनेक मोठं मोठ्या लेखकांच्या शर्यतीत एक नाव भविष्यात नक्कीच घेतलं जाईल ते म्हणजे आरव गजेंद्र राऊत ह्याचं. जेमतेम दहा वर्षाचा असून तो अनेक वेगवेगळ्या विषयांवर उत्स्फूर्तपणे लिखाण करतो.त्याचं लिखाण वाचून मनात विचार येतो की ज्या वयात मुलं मैदानावर खेळतात,टी व्ही बघतात त्या वयात आरव लिखाण करतो.म्हणून ह्या छोट्या लेखकाला मी तुमच्यापर्यंत पोचवत आहे.आरव हा माझा विद्यार्थी आहे यावर्षी त्याने आमच्या शाळेत इयत्ता पाचवीत प्रवेश घेतला.दुर्दैवाने ऑनलाइन शाळा असल्याने आमची प्रत्यक्षात भेट होऊ शकली नाही. त्याला मी इयत्ता पाचवीच्या व्हाट्सउप ग्रुपला ऍड केलं आणि त्याच्या बाबांनी मला त्याने लिहिलेले अनेक आर्टिकल त्याचे प्रवासवर्णने पाठवले मला त्याचं कुतूहल वाटू लागलं आणि एक दिवस मी त्याला एक विषय दिला आणि सांगितलं की तू तुझे कोरोना काळातील अनुभव लिही.ते अनुभव त्याने तब्बल दहा पानं भरून लिहिले.मग मलाही वाटलं की आपण आरवचं कौतुक करावं ह्या असामान्य मुलाबद्दल लोकांना कळावं म्हणून त्याच्या घरी जाऊन त्याची प्रत्यक्ष भेट घेतली आणि त्याचा लिखाणाचा प्रवास कसा सुरू झाला ते समजून घेतलं.
आरव गजेंद्र राऊत ह्याचा जन्म २५ जुलै २०१० रोजी झाला त्याचे वडील शैक्षणिक क्षेत्रात काम करत असल्याने विविध ठिकाणी फिरले.त्यामुळे आरव सुद्धा त्यांच्या सोबत फिरला.त्याची आई स्वाती त्याला लहानपणापासून गोष्टी सांगायची,गोष्टीची पुस्तके वाचून दाखवायची आणि ह्या गोष्टी ऐकत ऐकत वाचत वाचत त्याच्या मनात लिखाणाची आवड निर्माण झाली वयाच्या सहाव्या वर्षी त्याने पहिलं एक पण पूर्ण भरून लिहिलं ते एका कथेच्या पुस्तकावर त्याने लिहिलं “जानवरोका मेला”

हळूहळू ही लिखाणाची आवड वाढली आईवडील त्याचं कौतुक करू लागले,त्याला प्रोत्साहन देऊ लागले आणि दोन ओळी लिहिणारा आरव आता पानच्या पानं भरून लिहितो आहे.सुरुवातीला तो कोणत्याही वस्तूंबद्दल ,व्यक्तीबद्दल दोन तीन ओळीत आपले विचार लिहायचा मग विचारांची कक्षा वाढली आणि तो व्यापक झाला त्याच्या मनात येणारे विचार कागदावर मनसोक्त उतरवू लागला आणि हा छोटा लेखक भरपूर लिहू लागला. कविता, कथा,शाळेचे खेळ,शाळेतील आनंद मेळावा,सांस्कृतिक कार्यक्रम, त्याने केलेले प्रवास,वस्तुसंग्रहालयाला दिलेल्या भेटीचे वर्णन, सणवार,शाळेच्या सहली,एअरपोर्ट वरचा अनुभव,वाचलेल्या विविध कथा आणि पुस्तके,रॉकेट बनवून उडविण्याचा अनुभव ,कोविड काळातील अनुभव असं बरंच लिखाण त्याने त्याने आजवर केलं आहे.
मेरा रॉकेट क्यू नहीं उडा ह्या त्याच्या रॉकेट उडविण्याच्या प्रवासाचे त्याने वर्णन केले आहे .रॉकेट बनवून ते उडविण्यासाठी त्याने 2 वर्षात एकूण पंधरा प्रयत्न केले पंधराव्या प्रयत्नात त्याचं रॉकेट यशस्वीपणे उडालं आणि हे त्याचे सगळे प्रयत्न त्याने लिहिले आहेत.
खरंतर त्याचं आणि त्याच्या प्रामाणिक प्रयत्नाचं करावं तेवढं कौतुक कमी आहे.लिखाणा व्यतिरिक्त आरवला योगा करायला आवडते,चित्र काढायला आवडते,भाषण द्यायला आवडते,खेळ खेळायला आवडते आधुनिक तंत्रज्ञान समजून घेऊन ते शिकायला आवडते.त्याचे आर्टिकल, कथा तो लॅपटॉप वर स्वतः टाईप करतो एडिट करतो.त्याला कार्टून मूव्ही बघायला आवडतात .सैनिक आणि मिलिटरी वर आधारित चित्रपट बघायला आवडतात.आरवला मोठं होऊन एक आर्टिस्ट व्हायचं आहे.आई वडिलांसोबत दिल्ली,जयपूर, मुंबई,रायगड अश्या विविध ठिकाणी राहिल्यामुळे त्याच्या भाषेवर हिंदीचा बराच प्रभाव आहे .सुरुवातीला त्याने हिंदीतूनच लिहायला सुरुवात केली नंतर हळूहळू मराठी नीटपणे शिकून तो मराठीतून लिहू लागला.त्याचे वडील त्याला वेगवेगळे शब्दसमूह देऊन कथा लिहायला सांगतात सध्या तो एक कथा लिहितो आहे ज्यात त्याला राजा,राक्षस, सेना,घोडा,मगर,भाला, झेंडा,लढाई,प्रजा,हत्ती इत्यादी शब्द वापरायचे आहेत.त्याची ही कथा आतापर्यंत अठरा पानांची लिहून झाली आहे आणि लवकरच तो ती पूर्ण करून नवीन विषय लिहायला घेणार आहे.
आजच्या मोबाईल ,कम्प्युटर आणि भ्रामक जगात जिथे लहान मुलं फक्त मोबाईल वर गेम खेळतात इंटरनेटवर मनोरंजन करतात त्या युगात आरव मात्र कागद पेन घेऊन लिखाण करतो आहे ही बाब लक्षणीय आहे.मोठं मोठ्या लोकांना आज लिहायला वाचायला कंटाळा येतो आलेला मेसेज कॉपी करून आपलं नाव लिहून पुढे पाठवण्याची सवय लोकांना आहे.अश्या युगात एक लहानगा मुलगा आपल्या लेखनशैलीला विकसित करतोय ही गोष्ट आमच्यासाठी अभिमानास्पद आहे.आरवच्या क्षमता ओळखून त्याच्या आई वडिलांनी त्याला साथ दिली,प्रोत्साहन दिलं त्यासाठी त्यांचं देखील कौतुक व्हायला पाहिजे. लहान मुलं मातीच्या गोळ्यासारखी असतात त्याला हवा तसा आकार देता येतो.त्या गोळ्याला घडवणारा कुंभार जसा असेल तसा तो घडेल कुंभार जितका कारागीर तितकी त्याची वस्तू कलाकुसरीची असेल.त्याप्रमाणेच आरवचे आईवडील उत्तम कारागीर आहेत जे आपल्या मुलाला घडवीत आहेत.त्याला आतापर्यंत शिक्षक सुद्धा चांगले मिळाले ज्यांनी त्याच्या लिखाणाचं नेहमी कौतुक करून त्याला प्रोत्साहन दिलं.
उंची तुझ्या यशाची गाठील शिखरे नवी नवी होतील कोवळ्या हातांनी रचना नवी नवी उडतील स्वप्ने तुझी घेऊन पंख नवी नवी कवेत तुझ्या आसमंत दिशा मिळेल नवी नवी हसू असेच फुलू दे सुखे भेटू दे नवी नवी जिद्द तुझ्या मनातली बहरु दे नवी नवी
आज आरव सरस्वती विद्यालयाचा विद्यार्थी आहे भविष्यात तो आमच्या शाळेचं नाव नक्कीच उज्ज्वल करेल अशी मला खात्री आहे.मी स्वतःला खूप नशीबवान मानते की मला असा गुणी,होतकरू आणि हुशार विद्यार्थी मिळाला.भविष्यात तो खूप मोठा लेखक बनेल त्याच्या लेखणीतून उत्तमोत्तम शब्द आणि लिखाण लिहिल्या जाईल ही मला खात्री आहे.








