लेखक – दया पवार
पुस्तक परिचय / समीक्षा
समीक्षक: आरव राऊत, वर्ग 10, जवाहर नवोदय विद्यालय, अमरावती (महाराष्ट्र)
बऱ्याच दिवसांनंतर मला मराठी दलित साहित्यातील जागल्या हे पुस्तक वाचण्याची संधी मिळाली. याआधी मी मराठी दलित आत्मकथांपैकी उचल्या, जूठन, उपरा, भुरा, कोल्हाट्याचं पोर आणि बलुतं ही पुस्तके वाचली होती.

जागल्या हे पुस्तक मी माझ्या शाळेच्या ग्रंथालयातून इश्यू केले होते. दया पवार यांनी हे पुस्तक मराठी भाषेत लिहिले असून मेहता पब्लिशिंग हाऊसने ते प्रकाशित केले आहे. दलित जीवन, जातीव्यवस्था आणि समाजातील विसंगती हे या पुस्तकाचे मुख्य विषय आहेत.

जागल्या हे दया पवार यांचे मी वाचलेले दुसरे पुस्तक आहे. याआधी मी त्यांचे आत्मचरित्र बलुतं वाचले होते. बलुतं मध्ये त्यांनी आपल्या जीवनातील बारीकसारीक अनुभवांचे अत्यंत तटस्थपणे वर्णन केले आहे. त्याच प्रखर वास्तववादी दृष्टीकोनाची झलक जागल्या मध्येही दिसून येते. हे पुस्तक त्यांनी स्तंभलेखांच्या स्वरूपात लिहिले असून त्यात त्यांची कटाक्षपूर्ण आणि थेट भाषाशैली प्रकर्षाने जाणवते.
जागल्या हा ३१ कथांचा कथासंग्रह असून एकूण ११० पानांचे हे पुस्तक आहे. या कथांमधून दया पवार यांनी समाजातील अनेक प्रश्नांवर, विशेषतः आरक्षण, धर्म, राजकारण आणि आर्थिक शोषण यांसारख्या विषयांवर तीव्र भाषेत भाष्य केले आहे. इथं नको का तुम्हाला रिझर्वेशन, इटा, बोफोर्स, लगीन, जग बदल घालुनी घाव, फराळ, भीमराज, चिलखत निधी आणि अमिना अशा कथा या संग्रहात येतात.
बोफोर्स ही कथा मला विशेषतः आवडली. या कथेत बोफोर्स म्हणजे काळं धन असे लेखकाने म्हटले आहे. कथेत एक राजा आणि मंत्री वेषांतर करून त्यांच्या राज्यात फिरतात. त्यांना वाटते की त्यांच्या राज्यात बोफोर्स नाही. मात्र शेवटी त्यांना तो न्यायमंदिरातच सापडतो. या कथेत बोफोर्सला ईश्वरासारखे सर्वत्र व्यापलेले असल्याचे दाखवले असून लेखकाने त्याला “जळी-स्थळी-काष्टी-पाषाणी” असे म्हटले आहे.
इथं नको का तुम्हाला रिझर्वेशन या कथेत संडास साफ करण्याच्या कामात फक्त भंगी समाजाचेच १०० टक्के आरक्षण का आहे, यावर दया पवार यांनी तीव्र कटाक्ष टाकला आहे. इतर समाज या कामात कधी उतरणार, असा थेट प्रश्न लेखक वाचकांसमोर ठेवतो.
लगीन या कथेत हिंदू धर्मातील बांधवांवर कटाक्ष करण्यात आला आहे. आपल्या धर्मात दुसऱ्या धर्मात लग्न करण्याची सोय नाही, पण पळवून नेणे गुन्हा मानले जात नाही, या सामाजिक विसंगतीवर लेखकाने उपरोधाने भाष्य केले आहे.
जग बदल घालुनी घाव या कथेत अण्णा भाऊ साठे यांच्या शवयात्रेचे वर्णन आहे. रशियातही त्यांचे साहित्य मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय होते. अशा अण्णा भाऊंच्या अंत्यसंस्कारासाठी एक पैसाही नसणे, ही विदारक सामाजिक वास्तविकता या कथेतून समोर येते.
चिलखत निधी म्हणजे हफ्ता-ज्याद्वारे लहान व्यवसायांना तथाकथित सुरक्षा दिली जाते-या संकल्पनेवर आधारित कथा आहे. भीमराज या कथेत राम आणि हनुमान यांच्यातील संभाषणाच्या माध्यमातून आजच्या परिस्थितीचे विश्लेषण करण्यात आले आहे.
या छोट्या-छोट्या कथांमधून मला अनेक विषयांची माहिती मिळाली. फारसे नवे किंवा अवघड शब्द नसल्यामुळे वाचन सोपे झाले. शेवटी असे वाटते की जागल्या हे पुस्तक केवळ कथासंग्रह नसून समाजाला आरसा दाखवणारे लेखन आहे. या पुस्तकाने मला आणखी जास्त पुस्तके वाचण्याची प्रेरणा दिली, हीच या वाचनाची सर्वात मोठी जमेची बाजू आहे.

One thought on “जागल्या ”